महाकुंभमेळा आणि राष्ट्रीय शक्ती -मूळ इंग्रजी लेखक: ब्रिगेडियर परमजीत सिंग घोतडा (सेवानिवृत्त) मराठी अनुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

महाकुंभपर्वामध्ये
गंगास्नान करण्यासाठी मी अजूनही गेलेलो नाही हे ऐकताच तो म्हणाला, "इतक्या
मोठ्या स्तरावर हा महाकुंभमेळा आयोजित करणे म्हणजे पैशांचा आणि संसाधनांचा
निव्वळ अपव्यय आहे, दुसरं काय?" तो स्वतः नास्तिक असल्याचे त्याने मला
आधीच सांगितले होते.
मी हसतमुखानेच त्याला म्हणालो,
"तुझ्या चष्म्यातून तुला सर्व धर्मांमधल्या केवळ वाईट गोष्टीच दिसत राहणार
यात काही नवल नाही. पण एका सैनिकाच्या दृष्टिकोनातून मला तरी असे दिसते की,
भारताने आपले शत्रू आणि मित्र या दोघांनाही या कुंभमेळ्याद्वारे एक अतिशय
स्पष्ट इशारा दिलेला आहे."
माझे बोलणे ऐकताच त्याने भुवया उंचावून म्हटले, "सैनिकी दृष्टिकोन? पण धर्म आणि सैन्यदलांचा काय संबंध?"
"अगदी
घनिष्ठ संबंध आहे. आता असं पाहा, कोट्यवधी लोक लांबलांबून येऊन
प्रयागतीर्थी एकत्र जमले, इथे राहिले आणि सर्वांनी एका सामायिक श्रद्धेने
गंगेमध्ये स्नान केले. यामधून किमान चार गोष्टी स्पष्ट होतात: -
१. कोट्यवधी भारतीयांना अशा प्रकारे एकसंध समूहात एकवटता येणे शक्य आहे.
२. अभूतपूर्व अशा प्रकारचा हा सोहळा घडवून आणण्यासाठी लागणारी योजनक्षमता आपल्यामध्ये आहे.
३.
एखाद्या सांघिक ध्येयावर जर अढळ विश्वास असेल, तर ते उद्दिष्ट्य साध्य
करण्यासाठी, वैयक्तिक स्तरावर अपार कष्ट आणि गैरसोय सहन करण्याचा सोशिकपणा
भारतीयांमध्ये आहे.
४. आपल्या देशाचे नेतृत्व अत्यंत सक्षम आणि कणखर आहे.
अरे,
अवकाशात भ्रमण करणाऱ्या उपग्रहांनाही दिसू शकेल इतका भव्य सोहळा आपल्या
देशात आयोजित होतोय ही गोष्ट तुला अभिमानास्पद वाटत नाहीये का? मी तुला
सांगतो, आपले शत्रूदेखील या सोहळ्याकडे आज अचंबित होऊनच, पण अतिशय सावधपणे
पाहत असतील!"
त्याने नुसतेच खांदे उडवले आणि म्हणाला, "असेलही. पण माझा प्रश्न पुन्हा तोच आहे. सैनिकी दृष्टीकोनाचा इथे काय संबंध?"
जरासा
पुढे झुकत मी म्हणालो, "कल्पना करून बघ, एखाद्या युद्धाच्या प्रसंगी अशा
तऱ्हेने संपूर्ण जनसमूह एकवटून जर देशाच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहिला
तर युद्धावर किती जबरदस्त प्रभाव पडेल? पाकव्याप्त काश्मीर किंवा तिबेटला
शत्रूच्या जोखडातून मुक्त करायचे ठरवून जर असा जनसमूह उद्या एकवटला तर?
देशावर ओढवलेल्या एखाद्या संकटाचा सामना करण्यासाठी जर जनता अशा तऱ्हेने
एकत्र आली आणि त्यांनी यथाशक्ती दान केले तर केवढी प्रचंड संपत्ती उपलब्ध
होऊ शकेल माहितीये? हे बघ, कुंभमेळ्यासारख्या सोहळ्यातून एक गोष्ट ठळकपणे
सिद्ध होते - भारताची युद्धक्षमता केवळ सैन्यदलांचे शौर्य आणि त्यांच्या
शस्त्रसामर्थ्यावर अवलंबून नव्हे, तर त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या
जनतेच्या इच्छाशक्तीमध्ये आहे. जगातला कोणीही युद्धनीतिज्ञ माझे हे म्हणणे
मान्य करेल."
आता त्याच्या
चेहऱ्यावर काहीसे कडवट आणि कठोर भाव दिसू लागले, "या मेळ्यामध्ये झालेल्या
चेंगराचेंगरीत कित्येक निरपराध लोकांना प्राण गमवावे लागलेत, आणि तू इथे
बसून खुशाल राष्ट्रीय शक्तिप्रदर्शनाच्या पोकळ गप्पा मारतोयस? तुझं हे
बोलणं तुला विचित्र नाही का वाटत?"
एक
सुस्कारा सोडत मी उत्तरलो, "अरे, जरासा व्यापक विचार करून पाहा. ती
दुर्घटना घडून गेल्यानंतर तिथे जाणाऱ्या लोकांची संख्या कमी तर झालीच नाही -
उलट वाढलीच. शिवाय, प्रशासनानेही तेथील व्यवस्था अधिक सुरक्षित आणि
कार्यक्षम करण्यावर भर दिला. आपली जनता आणि प्रशासन या दोघांचाही निर्धारच
यातून ठळकपणे दिसतो. चीनमध्ये जर अशी चेंगराचेंगरीची घटना घडली असती तर काय
झालं असतं माहितीये? एकतर त्यांनी हा सोहळाच तातडीने गुंडाळून टाकला असता,
किंवा मग गर्दी नियंत्रित करण्यासाठी राक्षसी ताकद वापरली असती - जे
त्यांनी कोव्हिडकाळात केलंच होतं. त्यांच्या सैनिकांच्या गोळ्यांनी
त्यांचेच नागरिक मृत्युमुखी पडतानाचे व्हिडिओ नाही का पाहिलेस तू?"
आता मात्र तो उपहासाने हसत म्हणाला, "मग काय? इतकं सगळं झालं तरी आपण आपला आनंदसोहळा साजरा करत राहायचं, असं तुझं म्हणणं आहे का?"
"सोहळा तर साजरा करायचाच. पण ही वेळ अंतर्मुख होऊन गंभीर विचार करण्याचीदेखील आहे."
"कसला गंभीर विचार?" तो जरा चिडखोरपणेच बोलला.
मी
पुन्हा पुढे झुकत म्हणालो, "अरे, आईचं दूध प्यायलेला कोणीही शत्रू अशा
वेळी आपली राष्ट्रीय शक्ती खच्ची करू पाहील, आणि आपण जर गाफील राहिलो तर तो
यशस्वी होईलही."
माझी परीक्षा पाहत असल्याच्या अविर्भावात तो म्हणाला, "शत्रू आपली राष्ट्रीय शक्ती खच्ची करू पाहील? ते कसं काय बुवा?"
त्याचा
उपहास मला कळत होता, पण माझा प्रयत्न मी सोडला नाही. "हे बघ, कुंभमेळा
यशस्वीपणे पार पडण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे
लोकांची आस्था, आणि दुसरं, आपलं कार्यक्षम नेतृत्व. आपला शत्रू एकतर
लोकांची आस्था डळमळीत करण्याचा प्रयत्न करील, किंवा आपल्या डोक्यावर कमकुवत
नेते बसवण्याचा प्रयत्न करेल. भारतातल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल
प्रभावित करण्यासाठी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला गेल्याबद्दल
तू वाचलं नाहीस का?"
तो कुत्सितपणे उद्गारला, "ओहहो! आता मला माझ्यासमोर बसलेला 'अंधभक्त' स्पष्ट दिसायला लागला !"
मी
नुसतीच मान हलवली. कारण, मुद्देसूद चर्चा सोडून आता तो वैयक्तिक टीका करू
लागला होता. स्वतःमधल्या नकारात्मकतेमुळे आंधळा झालेला असूनही, तो मलाच
विनाकारण 'अंधभक्त' ठरवू पाहत होता. मी मनातून पुरता चडफडलो होतो. पण शक्य
तितक्या शांत स्वरात मी म्हणालो, "माझं दुर्दैव इतकंच की अतिशय व्यावहारिक
दृष्टिकोन असलेला, माझ्यातला एक सच्चा देशभक्त तुला दिसत तरी नाहीये, किंवा
तू पाहूच इच्छित नाहीस. असो."
याउप्पर त्याच्याशी कोणतीच सयुक्तिक चर्चा शक्य नसल्याने, मी तिथून निघून जाणेच श्रेयस्कर होते.
'गुरुवाणी'
मधला एक श्लोक जाता-जाता सहजच माझ्या मनात उमटला, "हम नाहीं चंगे, बुरा
नाहीं कोये, प्रणवथ नानक, तारे सोये।" म्हणजेच, "मी चांगला आहे असे नाही,
इतर लोक वाईट आहेत असेही नाही, नानक प्रार्थना करतो, तोच (देव) आमचा
तारणहार आहे!"
Very well translated!! Enjoyed the read
ReplyDelete